News

गणपती बाप्पा आता फक्त इको फ्रेंडलीच!

महाराष्ट्रात निर्माण होणारी प्रत्येक गणेश मूर्ती ही मातीची (शाडू) किंवा कागदाची असावी, तसेच या मूर्तींना नैसर्गिक रंग देणे बंधनकारक आहे, असा निकाल आज मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा आदेशही कोर्टाने दिला आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांनी २००५ मध्ये यासंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी आज झाली. यावेळी न्यायमूर्ती डी. बी. भोसले आणि आर. एन. बोरुडे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
महाराष्ट्रात दोन कोटी जनता आहे. त्यातील किमान एक कोटी जण ही आपल्या घऱी गणेश मूर्तींची स्थापना करतात. यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींची संख्या अधिक असते. या मूर्तींची विसर्जन करण्यात येते तेव्हा मोठ्या प्रमाणात प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे नदी, तलाव आणि विहिरींमध्ये जाते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर पाणी पडल्यास त्याचा दगड होतो. त्यामुळे नदीचे पाणी प्रदुषित होते. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालामुळे अनिसच्या प्रयत्नांचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया दाभोळकर यांनी स्टार माझाशी बोलताना व्यक्त केली.

Share
Published by
bappaadmin

This website uses cookies.