News

वडाच्या 2121 पानांपासून साकारला इको फ्रेंडली बाप्पा

रत्नागिरी: संजय वर्तक यांनी साकारलेल्या देखाव्याने त्यांच्या घराची एक खोलीच व्यापली गेली आहे. घरात प्रवेश करताच उंदरावर आरूढ झालेलं गणेशाचं भव्य-दिव्य रूप नजरेस पडतं.

गणेशाचं हे भव्य आणि मोहक रूप पाहताना आश्चर्याचा आणखी एक धक्का बसतो. जेव्हा हि मूर्ती आपण अधिक जवळून निरखून पाहतो. कारण हि मूर्ती साकारली गेलीय वडाच्या पानापासून. संजय वर्तक यांनी साकारलेल्या या मूर्तीकरिता वडाच्या झाडाची तब्बल 2121 पाने वापरली गेली आहेत.

वडाची पाने वाळवून त्यांना गणेशाच्या हव्या त्या आकारात वळवत वर्तक कुटुंबीयांनी हा आकर्षक गजराज घरच्या घरी साकारला आहे. पानांचा कल्पकतेने केलेला वापर आणि त्या वाळलेल्या नाजूक पानावर केलेले रेखीव काम ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.

हा गणेश जसा वडाच्या पानापासून साकारला गेलाय. तसाच तो ज्या उंदरावर आरूढ आहे, तो उंदीरमामाही याच वडांच्या पानापासून साकारला आहे. या देखाव्यात वापरलेली प्रत्येक गोष्ट पर्यापूरक म्हणजेच इको फ्रेंडली आहे. अगदी या गणरायाची आभुषणेही वडाच्या झाडाच्या पारंब्या वापरून तयार केली गेलीत.

या गणरायाच्या समोर दीपमाळ घेतलेला गजराजही पुठ्यातून साकारला आहे. संपूर्ण वर्तक कुटुंबाने मेहनत घेत गणेशाचं हे इको फ्रेंडली रूप साकारलं आहे. विशेष म्हणजे, वर्तक कुटुंब हे ‘एबीपी माझा’च्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेची गेली दोन वर्ष विजेते ठरलेले आहेत.

कोकणातील गावागावात असे आकर्षक देखावे या उत्सवात आपल्याला पाहायला मिळतात. अशा अनोख्या देखाव्यातूनच कोकणच्या गणेशोत्सवाचं वेगळेपण गणेश भक्तांकडून जपलं जात आहे.

संबंधित बातम्या-

कुर्मावतारातील इको फ्रेंडली देखाव्यात विराजमान झाले गणराय

लाल मातीपासून साकारल्या गणेश मूर्ती, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याची परंपरा जोपासली

Share
Published by
bappaadmin

This website uses cookies.