
रत्नागिरी: गणेशोत्सवात कोकणातील घराघरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना होते. पण कोकणातील ग्रामीण भागात या उत्सवाची तयारी दोन-अडीच महिने आधीच सुरु होते. गणेशोत्सव म्हणजे कोकणी माणसासाठी घरी येणाऱ्या बाप्पा बरोबरच आपली कला कुसर दाखवण्याची नामी संधीच असते.
दोन महिने आधीच मेहनत घेत कोकणातील युवक या गणेशोत्सवासाठी आकर्षक देखावे तयार करतात. विशेष म्हणजे यातील बहुतांश देखावे हे घराच्या आजूबाजूला सहज सापडणाऱ्या वस्तूंपासून तयार केलेले अर्थात इको फ्रेंडली असतात.
पुराणात देवाने कासवाचं रुप धारण करून पृथ्वीला सावरलं होतं. आता भ्रष्टाचार आणि प्रदूषणाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या पृथ्वीला पुन्हा सावरण्यासाठी देवाला पुन्हा आपलं रुपं घ्यावं लागणार, या संकल्पनेतून रत्नागिरीतल्या एका कुटुंबानं साकारलाय इको फ्रेंडली देखावा.
रत्नागिरीतील कोळवणकर कुटुंबाने हा एको फ्रेंडली देखावा साकरला आहे. अत्यंत कल्पकतेने साकारलेल्या या देखाव्यात, आपल्या घराच्या आजूबाजूला पडलेल्या वस्तूंचा योग्य वापर केला कोळवणकर कुटुंबीयाने केला आहे.
कासवाने पृथ्वी आपल्या पाठीवर तोलून घेतली आहे आणि त्यावर गणपती बाप्पा विराजमान झाल्याचा देखावा त्यांनी साकारला आहे. यातील पृथ्वीला तारणारे कासव हे बांबूच्या काठ्यांपासून तयार करण्यात आले आहे.
तर त्याची पाठ अत्यंत कल्पकतेने नारळाच्या करवंटीचे बारीक तुकडे करत साकारली आहे. या कासवाचं पाय आणि डोक भुईमुगाच्या शेंगाच्या टरफल्याचा वापर करत तयार केलं आहे.
कोकणात दरवर्षी गावागावातील तरुण मंडळी मध्ये अशा पद्धतीने अधिकाधिक आकर्षक देखावे साकारण्याची स्पर्धाच लागते. आणि यातूनच साकारले जातात आकर्ष देखावे.