News

गोदावरी एक्स्प्रेसमध्येही गणरायाची प्रतिष्ठापना, रेल्वे बोगीतील 18 वर्षांची परंपरा अखंडित

नाशिक:  गणेशोत्सव हा अवघ्या महाराष्ट्राचा उत्सव. समाजातील सर्वस्तरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र मनमाडमध्ये एक अनोखा गणेशोत्सव पाहायला मिळत आहे.

आज सकाळपासून मनमाड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक 4 वर ढोल-ताशांचा गजर सुरु होता. कारण दररोज हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणाऱ्या मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमध्येही सालाबादप्रमाणे गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

रोज सकाळी साडेआठ वाजता गोदावरी एक्स्प्रेस मनमाडहून मुंबईकडे रवाना होते. नाशिक-मुंबई असा रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना घेऊन ती देशाच्या आर्थिक राजधानीत येते. यासोबतच विद्यार्थी आणि सर्व सामान्य प्रवाशांनांही घेऊन येते.

अठरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मनमाडकरांच्या या हक्काच्या गाडीत गणरायाची स्थापना होऊ लागली. सर्वच जातीधर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन या गणेशाची स्थापना सुरू केली.

गणेशोत्सवाच्या काळात मासिक पासधारकांच्या बोगीत गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. या रेल्वेतील गणेशाच्या दर्शनासाठी मुंबईपर्यंतच्या प्रत्येक स्थानकावर दर्शनासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होते.

यावेळी सर्व प्रवासीही गणेशाकडे एकच प्रार्थना करतात की, माझा प्रवास सुखाचा होऊ दे,आणि मनमाडचे वागदर्डी धरण भरु दे.

या गोदावरी एक्स्प्रेसमध्ये संपूर्ण बोगीला आर्कषक पद्धतीने सजावण्यात येते. या सजावटीने संपूर्ण बोगीत होणारी श्रींची स्थापना येणाऱ्या प्रत्येकाला मनोमन सुखावते आणि प्रत्येक प्रवासी गणेशापुढे नतमस्तक होतो.

रोज नाशिक-मुंबई असा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांबरोबरच आपल्या लाडक्या बाप्पाचा दहा दिवसाचा प्रवास अविघ्नपणे सुरु राहतो.

What is your reaction?

Excited
0
Happy
0
In Love
0
Not Sure
0
Silly
0

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in:News