घरगुती गणपतीची १७० वर्षांची परंपरा


Bybappaadmin

घरगुती गणपतीची १७० वर्षांची परंपरा


लोकमान्य टिळकांनी सन १८९४मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात करून त्याला राष्ट्रीय उत्सवाचे स्वरूप दिले. या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२० वर्षे पूर्ण होत असताना, मुंबईतील पाठारे प्रभू समाजातील अजिंक्य कुटुंबातील घरगुती गणपती मात्र, यंदा १७०वे वर्ष साजरे करीत आहे. या घरगुती गणपतीची सुरुवात आधुनिक मुंबईचे एक शिल्पकार आणि ‘भाऊचा धक्का’ बांधणारे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य ऊर्फ भाऊ रसूल यांनी १८४५ साली केली. तर आज भाऊंच्या सहाव्या पिढीचे प्रतिनिधी असलेले विश्वास अजिंक्य आणि त्यांचे कुटुंब जुन्याच उत्साहाने व परंपरेने हा घरगुती गणेशोत्सव साजरा करतात.

भाऊंनी आपल्याला झालेल्या नातवाच्या आनंदाप्रीत्यर्थ त्यावर्षी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि नंतर भाऊंचा हा गणपती गिरगावची ओळख बनला. भाऊ अजिंक्य ऊर्फ ‘भाऊ रसूल’ हे मुंबईतील एक नामांकित व्यक्तिमत्त्व असल्यामुळे तत्कालीन ब्रिटिश राजवटीतील बड्या मंडळींपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सगळ्यांचा भाऊंच्या घरी राबता असायचा. साहजिकच बघता बघता भाऊंच्या घरातील या घरगुती उत्सवाला मोठे स्वरूप प्राप्त झाले. या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी भाऊंनी गणेशोत्सवाची ज्या साहित्याने सजावट केली होती, त्याच वस्तूंनी आजही सजावट केली जाते. लाकडाचे-चांदीचे मोठमोठे चौरंग, चांदीच्या मोठ्या समया, गणपतीच्या मागे चांदीच्या केवड्याच्या पानांची केलेली प्रभावळ इथपासून ते त्या काळात रॉकेलवर चालणारे दिवे… सारे काही आजही पूर्वीचेच आहे. विशेष म्हणजे, भाऊंच्या गणपतीच्या पूजेतील पंचामृताची भांडी ही औरंगजेबाचे मुलगे आझमशहा व कामबक्ष यांच्या काळातील नाण्यांना चांदीचे जोडकाम देऊन बनवलेली आहेत.

भाऊंच्या पुढच्या पिढीचे म्हणजे त्यांचे नातू विनायक रामचंद्र अजिंक्य यांचे बडोदा संस्थानचे अधिपती सयाजीराव गायकवाड यांच्याशी स्नेहाचे संबंध होते. तसेच विनायक अजिंक्य यांची एक बहीण इंदूरचे तत्कालीन संस्थाना‌धिपती तुकोजीराव होळकर यांना दिली होती. साहजिकच गायकवाड व होळकर यांच्याशी असलेल्या संपर्कामुळे त्या काळातील वस्तू आणि नाणीही अंजिक्यांच्या घरी आजही पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काळात अजिंक्य कुटुंबाचे वास्तव्य गिरगावात होते. १८-१९व्या शतकात पाठारे प्रभू समाजाची गिरगावातील मुख्य रस्त्यावर मोठमोठी घरे होती. त्यामुळे भाऊंच्या हयातीत सन १८४५ ते १८९५ या कालावधीत अजिंक्यांचा गणपतीत गिरगावात बसायचा. कालांतराने वास्तव्याचे ठिकाण बदलल्यामुळे सन १८९६ ते १९३५ पर्यंत अजिंक्यांचा गणपती परळ येथील वास्तूत आणला जाऊ लागला. तर त्यानंतर सन १९३६ पासून आजतागायत हा गणपती दादर टी.टी. येथील डॉ. आंबेडकर मार्गावरील प्रताप मॅन्शन येथील घरात विराजमान होत आहे. मात्र, काळ बदलला किंवा वास्तव्याचे ठिकाण बदलले, तरीही गणेशोत्सव साजरा करण्याची अंजिक्य कुटुंबाची रीत मात्र आजही एकोणिसाव्या शतकातलीच आहे. त्यामुळेच आजही त्यांच्या घरगुती गणेशाचे दर्शन घेताना भाविक कळतनकळत जुन्याच काळात जातात.

 

You may also like

Baby Ganesha

HD Wallpapers

Aagman Pictures

Visarjan Pictures

Fantasy Ganesha

Official Wallpapers

About the author

bappaadmin administrator

    Leave a Reply